From Awareness to Action: Muktayan Foundation’s Journey in Promoting and Conserving India’s Constitution
भारतीय संविधान हा आपल्या लोकशाही, न्याय आणि सामाजिक समतेचा कणा आहे. आपल्या देशातील बहुतांश लोकसंख्या संविधान, त्याचे महत्त्व, त्यांच्या आयुष्यातील भूमिका आणि त्यांच्या दैनंदिन समस्यांवर संविधानाचा होणारा प्रभाव याबाबत अजूनही अनभिज्ञ आहे. आपण जाणतोच की, भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क, कर्तव्ये, लोकशाही मूल्ये, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य आणि समानता प्रदान करते. म्हणून आपल्या अधिकारांचे आणि कर्तव्यांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, जेणेकरून आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारेल आणि आपल्या देशाचा विकास होईल.
मुक्तायन फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे, जी संविधानातील मूल्ये आणि तत्त्वांच्या आधारे कार्य करते. भारतातील प्रत्येक समाजघटकात संविधानाच्या मूल्यांचा अर्थ समजावून सांगणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे या संस्थेने संविधान मूल्यांचा प्रसार करण्यासाठी कार्यशाळा, विविध उपक्रम, गटचर्चा, खेळ अशा जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संस्थेचे सदस्य आणि स्वयंसेवक यांनी हे उपक्रम राबवून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान दिले आहे.
याचाच एक भाग म्हणून, २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त मुक्तायन फाउंडेशनने ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी “संविधानाचे महत्त्व आणि मूल्ये” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन केले. ही स्पर्धा कन्या शाळा, करंजे सातारा येथे घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण ४० विद्यार्थिनींनी भाग घेतला आणि तीन विजेत्यांना मुक्तायन फाउंडेशनकडून ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थी ५वी पासूनच राजकारणाचा अभ्यास करतात आणि भारतीय संविधानाची मूलभूत माहिती त्यांना चांगलीच माहित असते. या स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे त्यांच्या संविधान विषयक ज्ञानात वृद्धी करणे आणि अधिक सखोल समज निर्माण करणे हा होता.
या कार्यक्रमाचे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत:
१. समाजातील वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक स्तरातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला.
२. संविधानाच्या मूलभूत तत्त्वांबद्दल जनजागृती निर्माण झाली.
३. विद्यार्थ्यांना त्यांच्या संविधानिक अधिकारांचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली.
४. संविधानाच्या संवर्धनाविषयी जागरूकता वाढली.
५. विद्यार्थ्यांनी विविध जात आणि धर्मांमध्ये एकात्मता टिकवण्याचे महत्त्व आणि सामाजिक सलोखा राखण्याचे महत्त्व समजून घेतले, ज्यामुळे देशाचा प्रगतीचा मार्ग सुकर होईल.
Comments
Post a Comment